मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याला “मने जिंकणारा अर्थसंकल्प” असे संबोधले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र आणि देशवासियांची अपेक्षांची पूर्तता केली आहे. या अर्थसंकल्पाने शेतकरी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांवर व्यापक लक्ष केंद्रित केले आहे.
पवार यांनी अर्थसंकल्पातील काही महत्त्वपूर्ण तरतुदींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शेती आणि संबंधित क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि शास्त्रशुद्ध शेतीला प्रोत्साहन मिळेल. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ५ वर्षे वाढवण्यात आल्याने ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा प्राप्त होईल.युवकांच्या शिक्षण, रोजगार, आणि कौशल्य विकासासाठी १.४८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ५ वर्षांत २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण मिळेल. नवीन रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना पहिल्या महिन्यात भत्ता देण्यात येईल, याचा फायदा २१ कोटी युवकांना होईल. ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी युवकांना इंटर्नशिपच्या संधी मिळणार आहेत, तसेच १२ इंडस्ट्रियल पार्क उभारले जातील.
रुग्णांसाठी महत्त्वाच्या औषधांवरील अबकारी शुल्क कमी करण्याचा निर्णय, मोबाईल चार्जर आणि लिथियम बॅटरीवरील अधिभार कमी करणे, तसेच पीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत १ कोटी गरीब नागरिकांना १ लाख कोटी रुपये खर्चून घर देण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.प्राप्तीकराअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्याचे, तसेच पेन्शनची मर्यादा १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढवण्याचे निर्णय ४ कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांसाठी लाभदायक ठरतील.अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाच्या दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाची प्रशंसा केली आणि हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.