मुंबई : सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन आणलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे हा आझाद शिवसेनेची आझाद मेळावा आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरेरुपी हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, सहा महिन्यात पडेल अशी टीका केली जायची. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा चेला, आनंद दिघेंचा शिष्य आहे.मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे. सत्तांतर झालं नसतं तर राज्य कितीतरी मागे गेलं असतं. मी कोविडला घाबरून घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक प्रकल्पांना ब्रेक लागले. जिथे नव्हता ब्रोकर, तिथे यांनी लावले स्पीड ब्रेकर. मग त्या सरकारला आम्ही उखडून टाकलं आणि नवीन सरकारला आणलं.
माझी दाढी त्यांना खुपतंय. पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी. तुमच्या तोंडाला लागलेले शेण असे लपणार नाही. आम्ही रस्त्यावर फिरत होतो, रुग्णांना मदत करत होतो. तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कोणी भेटायला आलं त्याला बाहेर काढलं. हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही. तुम्ही काय काम केलं ते चार चौघात सांगू शकणार नाही. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की सांगू. यांच्या अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 17 हजार कोटींचे कर्ज वाढलं.