नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. 23 नोव्हेंबर रोजी प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार आले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारासाठी १५ डिसेंबर ही तारीख उजाडली. 33 कॅबिनेट आणि सहा राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राने बाजी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्राला दहा मंत्री मिळाले आहेत तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भाला फक्त नऊ मंत्री पदे मिळाले आहेत. ठाणे आणि कोकणाला एकूण नऊ मंत्रिपदी असून मराठवाड्यात फक्त सहा मंत्री झाले आहेत आणि मुंबईत एक अमराठी आणि एक मराठी असा मंत्री समतोल राखला गेला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मंत्री हे भाजपचे आहेत. शिंदे सेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपदी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा वरचष्मा असेल हे लक्षात येते.
मुंबई शहरातून मंगल प्रभात लोढा आणि मुंबई उपनगरातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रोटोकॉल मध्ये चौथा क्रमांक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि गेली दोन टर्म भाजप असा प्रवास झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मंत्रिपद पुन्हा देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांना पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र 1995 पासून भाजपचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करणारे सुधीर मुनगंटीवार यांना नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे सुधीर भाऊ नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसले. गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली कारण गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती.
पश्चिम विदर्भातून कै.भाऊसाहेब फुंडकर यांच्या त्यागाचे फळ त्यांचे पुत्र आकाश फुंडकर यांना मिळाले आहे. शांत आणि संयमी अशी भाऊसाहेबांची ख्याती होती. पक्षाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेतल्यानंतरही त्यांनी अजिबात कुरकुर केली नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र आकाश फुंडकर यांना संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके संजय कुटे यांना मात्र यावेळी सुद्धा संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी फेसबुक वर भली मोठी पोस्ट लिहून आपण नाराज नाही असा राग आळवला. मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्यासाठी तारखा देणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही घरी बसवण्यात आले आहे. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. आदिवासी विकास मंत्रीपदाचा अमर पट्टा घेऊन मिरवणारे डॉ. विजयकुमार गावित यांना घरी पाठवून त्यांच्या जागी सुखदेव उईके या मूळ भाजपाच्या आमदाराला संधी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाची यादी पाहिली असता विसर्जित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फारसे चालत नसल्याचे लक्षात येते. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना भाजपच्या सल्ल्याने नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे सेनेत फारसे आलबेल नाही. कोकणातून भरत गोगावले, उदय सामंत आणि राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. योगेश कदम यांचा ज्येष्ठ बंधू सिद्धेश कदम हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष असल्याने त्यांना मंत्रिपद मिळणार नाही अशी चर्चा होती. मात्र आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील शिवसेना नेते रामदास कदम यांची उपयुक्तता एकनाथ शिंदे यांना चांगलीच माहिती आहे. उद्धव ठाकरे हे कदम यांना ओळखू शकले नाहीत मात्र शिंदे हे कदम यांच्या वक्तृत्वाचा आगामी निवडणुकीत पुरेपूर वापर करून घेणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रामदास कदम हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी फडणवीस यांना अंगावर घेतले होते. रामदास कदम यांच्या आक्रमक स्वभावाला उद्धव ठाकरे प्रचंड घाबरतात. त्यामुळे त्यांनी 2019 साली त्यांचे पुत्र योगेश कदम यांना विधानसभेची उमेदवारी दिली.
ओबीसी हृदय सम्राट छगन भुजबळ आणि अकार्यक्षम मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी घरी बसवले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. मराठा समाजाला खुश करण्यासाठी अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल असे बोलले जाते. मात्र नेहमीप्रमाणे भुजबळ यांनी थयथयाट सुरू केला आहे. विधानसभेचे बहुचर्चित उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. सिन्नरचे वाचाळ आमदार माणिकराव कोकाटे आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करणारे दत्ता भारणे आणि मकरंद आबा पाटील यांना यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून अजित पवार यांनी संधी दिली आहे.
भाजप आणि शिंदे सेनेची यादी पाहिली असता त्या यादीवर भाजप पक्षश्रेष्ठींचा प्रभाव असल्याचे लक्षात येते. मात्र अजित पवारांनी यावेळी भाकरी परतवली आहे आणि आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना डावल्याचा त्यांनी बोल्ड निर्णय घेतला आहे.
* नितीन सावंत, 9892514124