सोलापूर : कुणाल दिपक घरत हे भाविक आपल्या कुंटुंबासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दर्शनाकरीता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून ११०००/- रुपये घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सविस्तर माहिती अशी की, कुणाल दिपक घरत, रा. बिलाल पाडा, नाला सोपार पुर्व, ता. वसई जि. पालघर हे भाविक आजसकाळी ११ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दर्शनाकरीता आले होते. यावेळी ते लवकर दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात विचारपूस करीत असताना, मंदिरा जवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरीता किमान ७-८ तास लागतील असे सांगितले. दर्शनाकरीता पास मिळतो का याबाबत चौकशी करीत असताना, चिंतामणी ऊर्फ मुकुंद मोहन उत्पात, पंढरपूर या व्यक्तिने मी मंदिरात पुजारी आहे, तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवुन आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील, ५००१/- रूपयेची मंदिर समितीची पावती देतो व ६०००/- रूपये मला वर द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम रुपये ११०००/- स्वीकारले.