मुंबई : कायद्यान्वये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई हे दोघेही गंभीर गुन्हेगार आहेत. मात्र, या दोघांचे अनुकरण करण्यासाठी काही तरुणाई पुढे येत आहे. विशेष म्हणजे या दोघांचे अनुकरण करणारे टी-शर्ट आणि वापरातील वस्तूंची खुलेआम विक्री होत असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर सायबर गुन्हे विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ही दोन नावे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी विश्वात आणि माध्यमांमध्ये सातत्याने झळकत आहेत. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव पुन्हा चर्चेत आले, तर अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबारामुळे बिश्नोई गँगकडूनच बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबधित वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई कॉमर्स वेबसाईटवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांसारखे उत्पादन हे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचं काम करत आहेत. तरुणाईवर नकारात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे, यांसारख्या वस्तू समाजिक मुल्यांचं अध:पतन करणाऱ्या असून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या आहेत. तसेच, तरुणाई वाईट मार्गाला जाऊन एका पिढीचं आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर क्राईमने गंभीर दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम व गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट प्रिंट करुन त्याची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट, अली एक्सप्रेस, आणि इट्सी सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट विक्री करण्यात आले आहेत.