– पक्ष अध्यक्षपदी राज ठाकरेंची फेरनिवड
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत २५० ते कमीत कमी २२५ जागांवर उमेदवार उतरवायचे आहेत. या राजकारणात कुठेही धार्मिक आणि जातीयवाद नसला पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातीचं राजकारण पाहायला मिळालं. यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागला आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुंबईतल्या रंगशारदा येथे पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेलं मतदान नरेंद्र मोदी यांना असलेल्या विरोधातून झालं. जनतेत महाविकास आघाडीबाबत प्रेम आहे, असं काही नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मराठी माणसांची मतं मिळतील, असं वाटलं होतं. पण तसं झालेलं नाही. त्यांना मिळालेली मतं मुस्लिम समाजाची आहेत.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून ४० आमदार फुटले होते. पण, शिवसेनेचं नाव, चिन्ह फुटलेल्या गटाला दिल्याचं मतदारांना पटलं नाही. त्याचाच फटका महायुतीला बसला आहे. निवडणुकीआधी मी दिल्लीत अमित शाह यांना भेटलो. या भेटीत भाजपानं बाळासाहेब ठाकरे यांच्यावरुन राजकारण करु नये, असं मी त्यांना सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. मनसेनं २० जागा महायुतीकडं मागितल्याची बातमी माध्यमांनी दिली. मात्र, आपण २०० ते २२५ जागा लढा. त्यामुळं कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याच्या दिशेनं तयारीला लागावं, असे आदेश ठाकरे यांनी दिले.
दरम्यान मनसे पक्षाच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची फेरनिवड करण्यात आली आहे. मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये एकमताने राज ठाकरेंची निवड झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार राज ठाकरेंची निवड झाली आहे. राज ठाकरे मनसे पक्षाचे २०२८ पर्यंत अध्यक्ष असणार आहेत. राज ठाकरे यांची नेमणूक करावी असा ठराव बाळा नांदगावकर यांनी मांडला, तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. या ठरावामध्ये एकमताने राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार राज ठाकरे यांची निवड झाली आहे.