मुंबई : विधानसभा निकालानंतर विजयी उमेदवार इतर राजकीय पक्षांच्या संपर्कात जाऊ नये यासाठी प्लॅन तयार केला आहे. सर्व विजयी उमेदवारांनी कुठं एकत्रित जमायचं, काय करायचं याची माहिती ठाकरेंनी उमेदवारांना दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संभाव्य घडामोडी आणि दगाफटका लक्षात घेता शिवसेना ठाकरे गटाकडून सावध हालचाली केल्या जात आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व उमेदवारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
ईव्हीएमवरून होणारी मतमोजणीची गुंतागुंत, कधी हरकती, लेखी तक्रारी याविषयी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते खबरदारी घेत आहेत. लोकसभेतील या घटनेनंतर ठाकरे गट वारंवार सावध भूमिका घेत आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जागा वाटपावरून झालेल्या वादांचा फटका बसल्याने पटोलेंना सत्ता स्थापनेच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा निकालाआधीची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले हे गैरहजर होते. या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील उपस्थित होते. यामुळे आता मतदान पार पडताच मविआच्या बैठकीत सतेज पाटील इन आणि नाना पटोले आऊट अशी चर्चा रंगू लागली आहे.