रत्नागिरी : सागरी सुरक्षेचा हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत; मात्र मासेमारी नौका मालकांकडून त्याबाबत गांभीर्याने न घेता कॅमेरे बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता नौदलाकडून कडक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र बहुसंख्य मच्छीमारांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते. अशा मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी याचे प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विम्याच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मानकानुसार जीवनरक्षक साधने, अग्निशमन साधने नसल्याचे आढळते. त्यामुळेच मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे अतिरिक्त तांडेल, खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येते.