‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’

0

राज्यस्तरीय मतदान जनजागृतीचा कार्यक्रमाचा जल्लोषात सुरुवात
‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव अनिल कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छा दूत निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गिताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अलि असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे – मान्यवरांनी केले आवाहन

अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या की, “प्रत्येक मत महत्त्वाचे असून तो महत्वपूर्ण अधिकार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत याचा आवर्जून लाभ घेवून मतदानाचा अधिकार बजवावा”.

अभिनेत्री सोनाली खरे म्हणाल्या की, “आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे मतदान करणे हेच आहे. मी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे. आपण देखील मतदान करा”.

दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे. तो प्रत्येकाचा हक्क आहे तो आपण बजवावा.

हास्य कलाकार भारती सिंग म्हणाल्या, “प्रत्येक सण आणि उत्सव आपण न सांगता साजरे करतो. मतदान करणे हा देखील लोकशाहीचा उत्सव आहे. आपण देखील २० नोव्हेंबरला मतदान करा मी देखील मतदान करणार आहे”.

अभिनेता आनंद म्हणाले की, “मनोरंजनासाठी आपण अनेकदा वेळेचा विचार करत नाही. मतदान हे पवित्र कार्य आहे यासाठी देखील आपण जरूर वेळ काढावा”.

अभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेते मनोज जोशी यांनी देखील मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे, असे आवाहन केले.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले की, “२० नोव्हेंबर रोजी मी स्वतः माझे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या दिवशी मतदान करणार आहे”.

या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी निश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात आले. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली
या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech