मुंबई : मुंबईत यंदा उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून गेल्या काही वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद झालीये. उन्हानं अंगाची लाहीलाही होत असताना लोकलचा गर्दीचा प्रवास अनेकांना जीवघेणा वाटतो. त्यामुळे आता तापलेल्या उन्हात मस्त एसीत बसून आरामदायी प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेने ऐन उन्हाळ्यात एसी लोकलच्या १४ सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची शुक्रवारी घोषणा करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार एसी लोकल सेवा या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे, कल्याण बदलापूर आणि वांगणी या सारख्या उपनगरीय केंद्रांदरम्यान चालवल्या जातील.
यामध्ये अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील ७ सेवांचा समावेश आहे. यातील कल्याण सीएसएमटी सकाळी ७.३४ ही गर्दीची सेवा तर सीएसएमटी ते ठाणे ही सायंकाळी ६.४५ ची सेवा ही सायंकाळची गर्दीची सेवा असणार आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि परत जाणाऱ्या कल्याण आणि ठाणेकरांना याचा फायदा होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई महानगर प्रदेशात रोज १८१० सेवा सुरू आहेत. यातून जवळपास ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. यातील ८४ हजार प्रवासी दररोज एसी लोकलने प्रवास करतात. सध्या मध्य रेल्वेकडे ६ एसी लोकल आहेत. यातील पाच लोकल दिवसभर ६६ फेऱ्या पूर्ण करतात. तर एक एसी लोकल राखीव असते. मध्य रेल्वेने ताफ्यात असलेली अंडरस्लन्ग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एकूण ७ एसी लोकल होणार आहेत. तर एसी लोकलच्या रोजच्या फेऱ्या ८० होणार आहेत.