नाशिक : आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर रामनवमी ते चैत्र पौर्णिमे दरम्यान देवीचा चैत्रोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या वर्षी सप्तश्रृंगगडावर तापमान ४० अंशावर गेल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली. मात्र अशा परिस्थितीत भाविकांची सप्तश्रृंगगडावर रेलचेल पाहायला मिळाली. यंदाचा वर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री किर्तीध्वज फडकला. गडावर उपस्थितीत असलेल्या भाविकांनी शनिवारी किर्तीध्वज पाहून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. रामनवमी ते चैत्र पौर्णिमा या सात दिवसाच्या कालावधीत ८ ते १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीची पंचामृत महापूजा नाशिकचे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष बी व्ही वाघ व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांचे गुरुमाऊली श्रीराम (आण्णासाहेब) मोरे यांनी परिवरासमेवत केली. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, सहव्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते.शुक्रवारी रात्री जय मातादी पदयात्रा शिरपूर येथील आबा चौधरी यांचा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित भाविकांची चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी सायंकाळ पर्यंत देवीच्या दर्शनासाठी बाऱ्या लागलेल्या होत्या. देवीचे मनोभावे दर्शन घेत खानदेश प्रांतातील भाविकांनी गड सोडला. या सात दिवसात विश्वस्त संस्थेचे अन्नपूर्णा प्रसादालयात १ लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विश्व मानव रहाणी केंद्र पिंपळनेर यांच्या माध्यमातून मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३२००० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच विश्व रहाणी केंद्र पिंपळनेर यांच्या माध्यमातून ५००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. चैत्रोत्सव यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अनिरुध्द अकॅडमी, सेवाभावी स्वयंसेवक, हंगामी मनुष्यबळ यासह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान देवू केले.