रांची – झारखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते चंपई सोरेन यांनी जेएमएमपासून फारकत घेत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारावास झाल्यानंतर त्यांनी राज्याची धुरा चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली होती. दरम्यानच्या काळात हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर चंपई यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पदावर राहण्याचा चंपई सोरेन यांचा मानस होता. परंतु, त्यांना मुख्यमंत्री पद सोडण्यास बाध्य करण्यात आले. तेव्हापासून चंपई सोरेन नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
त्यानंतर आता चंपई सोरेन यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. यासंदर्भात चंपई सोरेन म्हणाले की, ‘मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. मी तीन पर्याय दिले, निवृत्ती, संघटना किंवा मित्र. मी निवृत्त होणार नाही, पक्ष मजबूत करेन, नवा पक्ष काढेन आणि वाटेत एखादा चांगला मित्र भेटला तर त्याच्यासोबत पुढे जाईन असे त्यांनी सांगितले. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी आज, बुधवारी हाटा परिसरात समर्थकांची बैठक घेऊन स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आगामी 7 दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे. काल रात्री उशिरापासून त्यांच्या सरायकेला येथील निवासस्थानी समर्थकांची गर्दी होती.
दिल्लीहून परतल्यानंतर आपण काय करणार आहोत हे लवकरच कळेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने समर्थक पोहोचले होते. समर्थकांशी बोलल्यानंतर चंपई सोरेन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समर्थकांच्या भेटी घेत आहेत. स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या घोषणेनंतर, चंपई सोरेन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपला ज्या प्रकारे अपमान सुरू होता त्याचे वर्णन करता येऊ शकत नाही.दरम्यान नव्या पक्षाचे नाव काय असेल, हे त्यांनी अद्याप सांगितलेले नाही.