चंद्रपूर – ताडोबा अंधारी हॉटेलमधून 8 पर्यटक सुरक्षित स्थळी

0

चंद्रपूर – चंद्रपूर – मुल रोडवरील अंधारी नदीजवळ असलेल्या “ताडोबा अंधारी हॉटेल” मधून 8 पर्यटक व कर्मचारी यांना पाण्याच्या वेढ्यातुन बचाव पथकाच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले आहे.

अजयपूर साज्यातील पिंपळखुट येथे असलेल्या “रेड अर्थ रिसॉर्ट” मधुन मुंबई येथील 2 पर्यटक व रिसोर्टमधील 3 कर्मचारी यांना बोटीच्या सहाय्याने जिल्हा व शोध बचाव आपती व्यवस्थापन पथकाने बचाव करुन सुरक्षित स्थळी पोहचविले आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील रेहमत नगर येथे पावसाचे पाणी शिरल्यामुळे 25 ते 30 नागरीकांना महात्मा ज्योतीबा फुले, महानगरपालिका शाळा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.

सर्व ठिकाणांवरून स्थानांतरीत करण्यात आलेल्या नागरीकांना जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य सेवा व जेवणाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी बचाव पथकाचे सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण परिसराला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

गत 24 तासात जिल्ह्यात झालेला पाऊस : गत 24 तासात चंद्रपूर तालुक्यात 135.8 मिमी. पाऊस, मूल 164 मिमी., गोंडपिपरी 30.5 मिमी., वरोरा 89 मिमी., भद्रावती 99.9 मिमी., चिमूर 74.7 मिमी., ब्रम्हपुरी 48.5 मिमी., नागभीड 51.6 मिमी., सिंदेवाही 143.4 मिमी., राजुरा 44 मिमी., कोरपना 46 मिमी., सावली 174.4 मिमी., बल्लारपूर 73.5 मिमी., पोंभुर्णा 114.8 मिमी., आणि जिवती तालुक्यात 34.1 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच पर्यटनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 07172-250077 आणि 07172-272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही कळविण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech