मुंबई – मराठी विद्यापीठाच्या कामाचे कालबद्ध नियोजन करून या कामाला अधिक प्राधान्य देऊन गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठ सद्यस्थिती संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्य प्रशासकीय इमारत, कुलगुरू दालन, निबंधक दालन, आस्थापना बैठक व्यवस्था, थीमपार्क, विद्यार्थी बैठक व्यवस्था, ध्यानकेंद्र, स्वागतकक्ष, वाचनालय, मुले व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती, मोठे बहुउद्देशीय सभागृह आणि विद्यापीठ सुरू करण्यासाठी, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता करण्यासाठी अधिक गती द्यावी, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.