ठाणे : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ” प्रवास ” या कृतज्ञता दर्शक चरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक व युवासेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली. हा कार्यक्रम २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून माजी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे नेते माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळ नांदगावकर यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांच्या ६० वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या ‘ संघर्षापासून सन्मानापर्यंत ‘ प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे निमंत्रक पुर्वेश सरनाईक म्हणाले की, ” समाजसेवा आणि समाजसेवेच्या माध्यमातून विकासाचे अविरत ” प्रवासचक्र ” ज्यांच्या माध्यमातून गेली ६० वर्ष सुरू आहे, असे अत्यंत विनयशील आणि कार्यकर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे प्रताप सरनाईक!” अर्थात, एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवनातील संघर्षापासून सन्मानापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक साथीदाराचा कृतज्ञतापूर्वक सन्मान यानिमित्ताने व्हावा यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व हितचिंतकांनी, आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.