मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना-भाजप युतीत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं. या सरकारच्या स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि ‘किमान समान कार्यक्रम’ या तत्त्वावर सरकार बनविण्यात आलं. राज ठाकरे यांनी सांगितलं की, या प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. विशेषतः काँग्रेससोबत वाटाघाटी आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या कामात शिंदे यांचा सहभाग होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे खुलासे केले आहेत. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या काही पडद्यामागील घडामोडी उघड केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना सांगितलं होतं की, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्रीपद त्यांना दिलं जाईल. मात्र, नंतर उद्धव ठाकरे स्वतःच या पदावर विराजमान झाले. राज ठाकरे यांनी पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करत सांगितलं की, शिवसेनेने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांची फसवणूकच झाली. याच मुलाखतीत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, भाजपा आणि त्यांची भूमिका सारखी दिसते. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, की, साम्याच्या मुद्द्यावर विचार केल्यास काही गोष्टी सामायिक दिसू शकतात. एक गोष्ट आहे त्यात समान बघणार असाल तर ती बाहेर येणार ना. त्यातून वेगळी काय येणार आहे. लोकांनी भाजप-शिवसेना आघाडीवर विश्वास दाखवला होता, मात्र काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेऊन ते त्यांनी जनमताला फसवलं. शिवसेनेने राजकीय तटस्थता जपली असती तर अधिक योग्य ठरलं असतं, असही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या खुलाशामुळे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.