कोच्ची : केरळमध्ये वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चने मोर्चा उघडला आहे. या गावातील गावकऱ्यांच्या जमीन आणि मालमत्तेवर वक्फ बोर्डाने बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वक्फ बोर्ड गावकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करीत असल्याचा आरोप चर्चच्या लोकांनी लावला आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, केरळमधील चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावाची 2 गावे आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी वक्फ बोर्डाविरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या गावात ख्रिस्ती धर्मीय कुटुंबे राहत आहेत. दीर्घकाळापासून ते आपल्या मालमत्तेवर सरकारी करही भरत आहेत. त्यांच्याकडे याबाबत कागदपत्रे आहेत. मात्र आता या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. जमिनीची नोंदणी स्थानिक गावकऱ्यांच्या नावे आहे मग त्यावर वक्फ बोर्ड दावा कसे करू शकते..? असा सवाल या गावकऱ्यांनी केला आहे.
या मुद्द्यांवरून सध्या चांगलेच राजकारण पेटले आहे. केरळमध्ये ज्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करत आहे त्यावर कित्येक पिढ्या ख्रिश्चन कुटुंब राहत आहेत. वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यामुळे हा विषय इतका चिघळला आहे की, ख्रिस्ती कुटुंबाच्या अनेकांनी याविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे. जर हा मुद्दा निकाली काढला नाही तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिरो मालाबार चर्चचे मुख्य मेजर आर्कबिशप राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुनंबम प्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे.