सुयश व्याख्यानमालेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांचे आवाहन
ठाणे : बदलत्या अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना फोनवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. `अनोळखी व्यक्तीवर विश्वास म्हणजे विश्वासघात’ हे ध्यानात घेऊन कायम सतर्कता बाळगावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी बॅंकेमध्ये दोन खाती उघडून विना ऑनलाईन व विना एटीएम असलेल्या बॅंकेतील खात्यातच मोठी रक्कम ठेवावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके यांनी शनिवारी येथे केले.
ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेल्या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प ठाणे पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वारके यांनी `सायबर गुन्हे जनजागृती’ या विषयावर गुंफले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त हेमंत शिंदे, कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निशिकांत विश्वकार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय नलावडे, मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन राव यांची उपस्थिती होती. या व्याख्यानाला ठाण्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.
ऑनलाईन व फोनवरून होणाऱ्या फसवणुकीचे विविध प्रकारांची माहिती स्लाईड शोद्वारे नागरिकांना देण्यात आली. देशभरात २०२२ मध्ये ६५ हजार ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या. २०२३-२४ मध्ये त्याची संख्या ३ लाखांवर गेली, तर यंदा पहिल्या चार महिन्यांतच १५ लाख घटनांची नोंद झाली. त्यात सर्वसामान्यांच्या कष्टाचे ५ हजार १०० कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून चीनमध्ये गेले. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या घामाची कमाई भामट्यांनी पळवू नये, याची काळजी घेतानाच आपण कोणत्याही मोहात अडकू नये. या जगात कोणीही काहीही कधीही फूकट देत नाही. त्यामुळे मोफतच्या मागे कोणीही धावू नये. प्रत्यक्षात कधीही न भेटलेल्या व ऑनलाईन संपर्कात असलेल्या व्यक्तीने पैसे मागितल्यास लगेच सतर्क व्हावे. फोनवरून आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नये, अशी सूचना श्री. वारके यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांकडे निवृत्तीनंतर आलेला पैसा, तंत्रज्ञानाबाबत अल्प माहिती आणि एकलकोंडेपणा या कारणामुळे फसवणुकीच्या घटना वाढलेल्या आहेत, याकडे वारके यांनी लक्ष वेधले.
ब्रेकअप झालेला बॉयफ्रेंड, घटस्फोटीत व्यक्ती,नोकरीवरुन काढलेली व्यक्ती, शाळकरी मुलांकडून मस्करीत होणारे कृत्य, व्यावसायिक हॅकर, राजकीय वैरी आदींकडून ऑनलाईन वा ब्लॅकमेकींगने फसवणुकीच्या घटना घडू शकतात. मोठ्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन, आयपीओचे शेअर किंवा शेअर व्यवहारातून नफा, पॉलिसीतून बोनस, व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून सेक्सॉर्टशन, डीजीटल अॅरेस्ट, ओटीपी, ऑनलाईन लाईक करण्याचे टास्क आदी फसवणुकीचे प्रकार आहेत. इंटरनेटच्या वाढत्या सवयीमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसातील किती वेळ इंटरनेटसाठी द्यावा, याची कालमर्यादा ठरवून घ्यावी, असे आवाहन वारके यांनी केले. या वेळी अनेक नागरिकांच्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
`फसवणूक झाल्यास तत्काळ मित्र वा कुटुंबियांना माहिती द्या’
सध्या डिजिटल अॅरेस्टच्या घटना सातत्याने होत आहेत. बनावट पोलिस अधिकारी, बनावट पोलिस ठाणे, दिल्ली सीआयडीच्या नावाने फोन करण्याबरोबरच ऑनलाईनने आभास निर्माण केला जातो. भारतातील कायद्यात डिजिटल अॅरेस्ट असा कोणताही प्रकार नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने फोनवरून फसवणूक वा डिजिटल अॅरेस्ट केल्यास तत्काळ मित्र वा कुटुंबियांना माहिती द्यावी. तसेच स्थानिक पोलिस व सायबर पोलिस ठाण्यात धाव घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांनी केले.