भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे : ठाणे शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी संकुले, रहिवाशी इमारती आणि निवासी संकुले उभारण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच ठाण्यातील नागरिकांच्या सध्याच्या हालांची दखल घेण्याची विनंती केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत पोचली असून, ठाणे महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाने ५ हजार ६४५ कोटी रुपयांपर्यंत भरारी घेतली आहे. मात्र, शहरातील नागरिकांना किमान नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत, हे दुर्देवी आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, उत्तम रस्ते आदी आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे, नव्याने येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये. तसेच सद्यस्थितीत उपलब्ध नागरी सुविधांवरील ताण कमी व्हावा, यासाठी शहरात नव्या बांधकामांना बंदी गरजेची आहे, असे मत नारायण पवार यांनी व्यक्त केले.
शहरातील भूमाफियांकडून मिळेल त्या जागी बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. त्यात सामान्य नागरिकांना फसवणूक करून घरे दिली जात आहेत. गेल्या ४२ वर्षात ठाणे महापालिका स्वतंत्र धरण उभारू शकलेली नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, घोडबंदर रोड, दिवा भागाबरोबरच मुख्य शहरात दूषित पाण्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. शहरातील अनेक भागात वाहतूककोंडी भेडसावत असून, मुख्य रस्ते व चौकांमध्ये फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते.
शहरात तीव्र पाणीटंचाई असतानाच, गेल्या आठवडाभरापासून ठाणे शहराच्या कानाकोपऱ्यात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. राज्य सरकारने ठाणे महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ एकर जागा दिली. परंतु, त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्था करण्यात महापालिका प्रशासन असमर्थ ठरले. ठाणे शहरातील नागरिकांसाठी सक्षम आरोग्यवस्था उपलब्ध नाही. महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कारभाराचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालय ‘कोमात” गेले असून, सातत्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून रिक्त पदे भरली जात नाहीत, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
या परिस्थितीमुळे ठाणे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आणखी वाढल्यास नागरी सुविधांवर मोठा ताण येईल. त्यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांना हालअपेष्ठांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे शहरातील नागरिकांना परिपूर्ण नागरी सुविधा मिळेपर्यंत, ठाणे महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये. तसेच सुरू असलेली बेकायदा बांधकामे तत्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी नारायण पवार यांनी पत्रात केली आहे.