नागपूर : स्वतःची खोटी ओखळ सांगून लग्न करायचे आणि मुले जन्माला घालून सोडून द्यायचे असे लव्ह जिहादचे प्रकरणे आहेत. यात तरुणींना फूस लावणे, फसवणे किंवा जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे हे मात्र योग्य नाही. लव्ह जिहादचे वाढते प्रकार वाईट आणि चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज, रविवारी नागपुरातील रेशीमबाग येथे व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकुंभाच्या जलाभिषेक कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, सुप्रीम कोर्टानेही आपल्या निर्णयात लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केली आहे.
केरळ हायकोर्टने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात सातत्याने अशा घटना घडत असून या प्रकरणाची भर पडत आहे. समजावून घेण्याची बाब अशी की, एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न करणे वाईट नाही. मात्र आपली खोटी ओळख देत लग्न करणे, मुले झाल्यावर मुले आणि पत्नीला वाऱ्यावर सोडून देणे ही गंभीर घटना आहे. असे प्रकार देश आणि समाजासाठी चिंताजनक आहेत. त्यामुळे राज्य सरकार लव्ह जिहाद कायद्याच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, दिल्ली येथे शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून यापुढे अशा घटना होऊ नयेत यादृष्टीने काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.