लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सर्व धर्मांचे लोक सुरक्षित आहेत. हिंदू सुरक्षित असतील, तर मुस्लिमही सुरक्षित राहतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी एका मुलाखतीत केले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, १०० हिंदू कुटुंबांमध्ये एखादे मुस्लिम कुटुंब सर्वात सुरक्षित असते. त्यांना त्यांच्या धार्मिक परंपरा पाळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. पण १०० मुस्लिम कुटुंबांमध्ये ५० हिंदू सुरक्षित राहू शकतील का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान याची उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानात काय झाले ? कुठे काही घडत असेल किंवा कोणाला मारले जात असेल, तर आपल्याला सतर्क राहावे लागते, असे योगी म्हणाले. उत्तरप्रदेशात २०१७ पूर्वी दंगली व्हायच्या. हिंदूंची घरे, दुकाने जळत असतील, तर मुस्लिमांचीही घरे, दुकाने जळत होती. पण २०१७ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यात दंगली थांबल्या. मी एक साधा नागरिक आहे, उत्तर प्रदेशचा नागरिक आहे. मी एक योगी आहे, जो सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतो.
मला सर्वसमावेशक विकासावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आणि संस्कृती आहे. तुम्ही त्याच्या नावावरूनच हे ओळखू शकता. सनातन धर्माच्या अनुयायांनी कधीही इतरांना धर्मांतरित केले नाही. पण त्यांना याबदल्यात काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. हिंदू राजांनी त्यांच्या शक्तीचा वापर करून इतरांवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा इतिहास जगात कुठेही सापडणार नाही असे त्यांनी सांगितले. हिंदू धर्माची महत्त्वाची स्थळे ही भारताच्या संस्कृतीचा वारसा आहेत. आपण त्यांना जगासमोर आणणार आहोत. ज्यांना देवाने डोळे दिले आहेत, त्यांनी ते पाहावे. संभलमध्ये शाही जामा मशिदीबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. काही याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की ही मशिद एका प्राचीन हिंदू मंदिराच्या अवशेषांवर बांधली आहे. इस्लाम देखील मान्य करतो की मंदिर उद्ध्वस्त करून उभारलेली मशिद परमेश्वर स्वीकारत नाही. मग त्या का बांधण्यात आल्या? शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत. आम्ही दाखवणार आहोत की ती मंदिरे कुठे होती आणि एकेक करून त्यांचा उलगडा करू. मथुरा येथील मशीद वादाबाबत आम्ही न्यायालयाचा निर्णय पाळत आहोत; अन्यथा आतापर्यंत काय झाले असते, सांगता येत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना “नमुना” म्हटले. अशा प्रकारचे काही ‘नमुने’ (उदाहरणार्थ, राहुल गांधी) भाजपसाठी फायद्याचे ठरतात. त्यांचा ‘भारत जोडो अभियान’ हा प्रत्यक्षात ‘भारत तोडो अभियान’ होता. ते भारताबाहेर जाऊन भारताची निंदा करतात. देशवासियांनी त्यांचा हेतू ओळखला. असे नमुने भाजपसाठी आवश्यक आहेत. जेणेकरून आमचा मार्ग नेहमी स्पष्ट राहील. काँग्रेसला अयोध्या प्रश्न कायम वादग्रस्त ठेवायचा होता. त्यांनी तीन तलाक का हटवले नाही? त्यांनी कुंभ मेळाव्याचा अभिमानाने आणि भक्तिभावाने प्रचार का केला नाही? काँग्रेसने जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा का उभारल्या नाहीत..? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.