औरंगजेबवरील स्तुतीवरून सोडले टीकास्त्र
लखनऊ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबच्या स्तुतीचे प्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. समाजवादी पार्टीने अबू आझमीची पक्षातून हकालपट्टी करावी. तसेच आझमींना उत्तरप्रदेशात पाठवावे इथे त्यांच्यावर उपचार करू असा टोला योगींनी लगावला आहे. अबू आझमी यांनी छत्रपती संभाजीराजे व औरंगजेब याच्यातील युद्धाविषयी बोलताना धक्कादायक विधान केले. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसेच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती सत्तेची होती असे देखील ते म्हणाले आहेत. पुढे त्यांनी यावर बोलताना म्हटले की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान पासून ब्रम्हदेशपर्यंत होती. त्याकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता. त्यामुळे औरंगजेबाची प्रतिमा सध्या चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असा दावाही त्यांनी केला. औरंगजेबचे कौतुक करणे अबु आझमींना भोवले असून आज, बुधवारी महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव मंजूर झाला असून अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
आझमींच्या या वादग्रस्त विधानाबद्दल आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमी यांच्यासह समाजवादी पक्षावर हल्लाबोल चढवला आहे. औरंगजेबावर केलेल्या विधानामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू असे योगी म्हणाले. तसेच ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगायला लाज वाटते. अभिमान बाळगण्याऐवजी औरंगजेबाला आपला आदर्श मानतात, त्यांना आपल्या देशात राहण्याचा अधिकार आहे का ? समाजवादी पक्षाने याचे उत्तर द्यावे असे योगी म्हणालेत. एकीकडे तुम्ही महाकुंभाला दोष देता. तर दुसरीकडे, तुम्ही औरंगजेबसारख्या व्यक्तीचे कौतुक करता, ज्याने देशातील मंदिरे उद्ध्वस्त केली. तुम्ही तुमच्या त्या आमदारावर नियंत्रण ठेऊ शकत नाही का? तुम्ही त्यांच्या विधानाचा निषेध का केला नाही ? असा संतप्त सवाल योगी यांनी केला आहे.
दरम्यान अबू आझमीच्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, जर निलंबनाचा आधार विचारसरणीने प्रभावित होऊ लागला. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गुलामगिरीत काय फरक राहील ? आपले आमदार असोत किंवा खासदार, त्यांचा निर्भय शहाणपणा अतुलनीय आहे. जर काही लोकांना असे वाटत असेल की ‘निलंबन’ करून सत्याचा आवाज दाबता येतो, तर हा त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा बालिशपणा असल्याचे यादव म्हणालेत.