नियमभंग झाल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई
मुंबई : राज्यात यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल. तसेच कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल असा इशारा फडणवीस यांनी दिला. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यामुळे सर्वसामान्यांना आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे आणि अतुल भातखळकर एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्नांकडे लक्ष वेधले. लक्षवेधी सूचनेनुसार मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात प्रार्थना स्थळांवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २३ जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनीप्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले व काही उपाय करण्याचे आदेश दिले. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. भोंग्यांचा वापर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत करण्यास बंदी असूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भोंग्यांवर कारवाई करण्याची जाबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर सोपवण्यात यावी, अशी मागणी फरांदे यांनी केली. त्याला भातखळकर यांनीही पाठिंबा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जानेवारीच्या निर्णयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या लक्षवेधीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले की, भोंग्यांचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर सोपवली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत फडणवीसांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषण करणा-याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून या आदेशानुसार कारवाया करण्यात येत आहेत. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसीबल व रात्री ४५ डेसीबल आवाजाची मर्यादा आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर वापर करण्यास बंदी असल्यामुळे विहित वेळेत भोंगा बंद न केल्यास व तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच, पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यापुढे ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास विनाविलंब तात्काळ कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून प्रार्थना स्थळांवरील भोंग्यावर कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाही करण्याकरिता अग्रेशित करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.