सोलापूर : सिनेअभिनेता वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्याने सोलापुरात १० ते १२ जणांनी फोटो काढण्याच्या निमित्ताने जवळ येऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची पोस्ट विनोदवीर प्रणित मोरे याने इन्स्टाग्रामवर टाकली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत सदर बझार पोलिसांच्या डायरीला नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यास चौकशी करुन फिर्याद देण्यासाठी बोलाविले आहे.
सात रस्ता परिसरातील हॉटेल २४-के क्राफ्ट ब्रेव्ज् येथे एका कार्यक्रमासाठी विनोदवीर प्रणित मोरे २ फेब्रुवारीला सोलापुरात आला होता. त्यावेळी काहीजण त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आले आणि त्यांनी मारहाण केली, असे त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सिनेअभिनेता वीर पहाडिया याच्यावर विनोद केल्याने हा प्रकार झाला आहे. पुन्हा वीर पहाडिया यांच्यावर विनोद केल्यास आणखी मार खाशील, असेही त्यातील लोक म्हणत होते, असेही त्याने म्हटले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यावर तक्रार घेतली नसल्याचेही तो म्हणाला. पण, तो पोलिस ठाण्यात आलाच नव्हता असा दावा सदर बझार पोलिसांनी केला आहे.