केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया….
मुंबई – कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला असून केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी,महिला,युवा, कौशल्य विकास,रोजगार,पायाभूत सुविधांची उभारणी,शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना बळ… : केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी तब्बल १ लाख ५२ हजार कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा असून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्य शासनानेही महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
नविन कररचना ही सामान्यांना, नोकरदारांना दिलासा देणारी असून त्याचे मी स्वागतच करतो, असे सांगत या नव्या कररचनेमुळे करदात्यांची संख्याही वाढेल आणि यातून विकासाला आवश्यक असणारे करसंकलनातही महाराष्ट्रात अग्रेसर राहील,असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ग्रामीण भागाचा कायापालट… : या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा या नऊ घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली २ लाख ६६ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद खेड्यांचा कायापालटच करणारी ठरेल, असाही विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
५० लाख अतिरिक्त रोजगार… : आपला देश युवांचाही असल्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पहायला मिळाले असून युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या असून पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात देण्याचा निर्णय हा युवांसाठी दिलासा देणारा आहे.५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याच्या निर्धारामुळे महाराष्ट्रातील युवकांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केलेली ११ लाख कोटींची भांडवली तरतूद, याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकारी धोरणांमधून प्रोत्साहन देण्याचा घेतलेला निर्णयामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.त्याचवेळी देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय हा उद्योगक्षेत्राला भरारी देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशभरातील २५ हजार गावांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा ४ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असून पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेद्वारे सौर ऊर्जेला चालनाच मिळणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.