विद्यार्थिनींच्या सुरक्षा उपाययोजनांच्या सक्षमीकरणासाठी समिती – केसरकर

0

मुंबई – विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या उपाययोजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, या समितीने नागरिक, शिक्षण आणि विद्यार्थिनींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सूचना असल्यास त्या ऐकून तातडीने अधिक उपाययोजना सुचवाव्यात. सर्व शाळा आयुक्तालयाशी जोडाव्यात. प्रत्येक शाळेला किमान एक इंटरॲक्टीव्ह टीव्ही देऊन त्या माध्यमातून विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यावे. आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात यावा. चांगला आणि वाईट स्पर्श ओळखायला शिकवावे. यासाठी माता बालक संघाचीही मदत घ्यावी.

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, शालेय शिक्षण प्रधान सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प आयुक्त कैलास पगारे यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनुप यादव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, एससीईआरटी चे संचालक राहूल रेखावार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महिला बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या, अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या घटना अतिशय दुर्देवी आहेत. मोठ्या विद्यार्थिनींना दिले जाणारे प्रशिक्षण अल्पवयीन विद्यार्थिनींना समजणे कठीण जाईल, यासाठी ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमातून त्यांना शिकविण्यात यावे. गुड आणि बॅड टच बाबत अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech