स्वत: प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
ठाणे – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भांजे डोंगरावर लागलेल्या आगीबाबत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून विशेष चौकशी करावी, अशी मागणी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने विजय त्रिपाठी यांनी केली आहे. तसेच अनधिकृत मजार, गाळे, कब्रिस्तानांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी विजय त्रिपाठी यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा-भांजे डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती तसेच ही जागा राष्ट्रीय उद्यान देखील आहे. या उद्यानात असलेल्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हे उद्यान ठाणे शहराचा एक अनमोल ठेवा आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी या डोंगरावर भीषण आग लागली असून, या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे वनसंपदा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम झाले असल्याची बाब विजय त्रिपाठी यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे.
या परिसरात भारताचे एअर फोर्स स्टेशन आहे. हा भाग अत्यंत संवेदशनशील आहे. एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या परिसराचा दहशतवादी करवायांसाठी वापर केला जाण्याची माहिती दिली आहे. वाढता अनधिकृत वसाहतींचा प्रभाव आणि नशा करणाऱ्या लोकांची उपस्थिती चिंतेचा विषय बनली आहे. अनेक वेळा या परिसरात अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरणीय स्थिरता धोक्यात आलेली आहे. आग लागण्याच्या या घटनेमुळे, या परिसरात असलेल्या वनस्पती आणि जीवसृष्टीवर गंभीर परिणाम झाला आहे, जो आपल्या निसर्गसंपत्तीच्या संरक्षणासाठी अत्यंत चिंताजनक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि वसाहतींचा वाढता प्रभाव यामुळे स्थानिक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याशिवाय, या परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांच्या उपस्थितीमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे आग लागण्याची शक्यता वाढली आहे आणि याबाबत तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे विजय त्रिपाठी यांनी निवेदनात म्हटले आहे.
या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा घालता येईल. वन विभागाने या परिसरातील अनधिकृत वसाहतींविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निसर्गसंपत्तीचे संरक्षण होईल असे या निवेदनांत नमूद करून आपण आपल्या कार्यकाळात या समस्येवर लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास, आपण ठाणे शहराच्या निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकता आणि हीच आमच्याकडून आपणास कळकळीची विनंती असल्याचे शेवटी विजय त्रिपाठी यांनी म्हटले आहे.