रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १०० जि.प. शाळांना संगणक

0

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील १०० जिल्हा परिषद शाळांना संगणक देण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील मुलांना संगणक विषयाचे अद्यावत ज्ञान मिळावे, याकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसह १०० संगणक संच उपलब्ध करून मिळावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे करण्यात आली होती. याबाबत बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळामध्ये निर्णय घेऊन २ टप्प्यांत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता संगणक संच देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संगणक संच घेणे शक्य नसल्याने, विद्यार्थ्यांची गरज तसेच संगणकाचा त्यांच्या भविष्यकाळात होणारा उपयोग या बाबी विचारांत घेऊन रत्नागिरी जिल्हा बँकेने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना १०० संगणक संच देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी संजय कांबळे यांच्याकडे ५० संगणक संच सुपूर्द करण्यात आले होते.

उर्वरित ५० संगणक संचांचा वितरण कार्यक्रम बँकेचे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या संगणक संचांचे वितरण बँकेचे बाबाजीराव जाधव, तसेच उपस्थित संचालक डॉ. जयवंत जालगावकर, ॲड. दीपक पटवर्धन, संजय रेडीज, मधुकर टिळेकर, राजेंद्र सुर्वे, डॉ. अनिल जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी संजय कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech