पाटणा – देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट युजी २०२४ च्या परीक्षेचा पेपर फुटल्याने बिहारपासून राजस्थानपर्यंत विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेपर फुटल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करीत विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले. पाटणामध्ये रविवारी नीट युजी २०२४ घेण्यात आली होती.
पेपरफुटीबरोबरच डमी परीक्षार्थींचेही एक प्रकरण राजस्थानमधून समोर आला आहे.राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक डमी विद्यार्थी पकडला गेला.तर राजस्थानच्याच माधोपूरमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी परीक्षा केंद्रावरच जोरदार निदर्शने केली. राजस्थानच्या सीकरमध्ये एका परीक्षार्थी विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राच्या बाहेर चाकूने भोसकले.त्यानंतर तो जणू घडलेच नाही अशा अविर्भावात परीक्षा केंद्रात गेला आणि त्याने पेपर लिहिला.तोपर्यंत पोलीस त्याची वाट बघत परीक्षा केंद्राबाहेर थांबले होते.