लखनऊ – बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी आज, सोमवारी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस वाईट दिवसात दलितांना प्राधान्य देते आणि पक्षाला चांगले दिवस आले की बाजूला सारते, अशी टीका मायावती यांनी केली आहे. यासंदर्भात मायावतींनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट शेअर केलीय. आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये मायावती म्हणाल्या की, देशातील तापर्यंतच्या विविध घटनांवरून असे दिसते की, विशेषतः काँग्रेस आणि इतर जातीयवादी पक्षांमध्ये वाईट दिवसांमध्ये दलितांची आठवण येते. त्यावेळी दलितांना मुख्यमंत्री, संघटनेतील प्रमुख पदे मिळतात. परंतु, हे पक्ष त्यांच्या चांगल्या दिवसात मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष करतात. चांगल्या दिवसात दलितांऐवजी जातीयवादी लोकांना प्रमुख पदांवर ठेवले जाते. असाच प्रकार हरियाणामध्येही अनुभवास येतोय. अपमानित होणाऱ्या दलित नेत्यांनी आपले उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन अशा पक्षांपासून स्वतःला वेगळे केले पाहिजे. तसेच आपल्या समाजाला अशा पक्षांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण डॉ. आंबेडकरांनी देशातील कमकुवत वर्गाच्या स्वाभिमानासाठी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता याचे स्मरण मायावतींनी करवून दिले. तसेच त्यांनी सांगितले की, सहारनपूर जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या प्रकरणी त्यांची उपेक्षा आणि त्यांना बोलू न दिल्याने त्यांच्याकडून प्रेरीत होऊन मीही त्यांच्या सन्मानार्थ आणि स्वाभिमानाने माझ्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत दलितांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय काँग्रेस आणि इतर जातीवादी पक्ष सुरुवातीपासूनच त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याबाबत जाहीर आहे. दलितांनी अशा संविधानाविरोधी, आरक्षणविरोधी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात असलेल्या पक्षांपासून सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन मायावती यांनी केले आहे.