मणिपूर प्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र खर्गे यांनी केली हस्तक्षेप करण्याची केली मागणी
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरी हक्कांशी गंभीरपणे तडजोड केली जात आहे. राज्यघटनेचे मूल्य अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी तातडीने हस्तक्षेप करून जनतेच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे घटनात्मकदृष्ट्या आवश्यक झाल्याचे खर्गे म्हणाले. राष्ट्रपती भवनाच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरचे लोक पुन्हा एकदा त्यांच्या घरात सुरक्षितता आणि सन्मानाने जगू शकतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मणिपूरमधील जातीय संघर्षादरम्यान होणारी जीवित आणि मालमत्तेची हानी थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
मणिपूरमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्षात 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे खरगे यांनी आपल्या पत्रात तपशीलवार स्पष्ट केले आहे. यामध्ये महिला, लहान मुले आणि अगदी नवजात बालकांचाही समावेश आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तेथील अर्थव्यवस्था कोलमडली असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्यातील जनता पंतप्रधानांना राज्याच्या दौऱ्यावर येण्याचे आवाहन करत आहे, मात्र ते अद्याप तेथे गेलेले नाहीत असा टोलाही काँग्रेसने आपल्या पत्रातून लगावला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात मणिपूरमधील परिस्थितीची माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असे खरगे यांनी म्हंटले आहे.