मुंबई – काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशात शरिया कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे वितरण करण्याचा इरादा व्यक्त केल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय. राज्यातील अमरोहा येथे आज, मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसवर टीका करताना योगी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाचा विश्वासघात केला आहे. आता पुन्हा एकदा ते फसवणुकीसाठी खोट्या घोषणा घेऊन तुमच्याकडे आले आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा बघा, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही ‘शरिया कायदा’ लागू करू, असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्हीच सांगा हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेने चालेल की शरियतने ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की, आम्ही वैयक्तिक कायदा म्हणजेच शरिया कायदा लागू करू. कारण मोदींनी तिहेरी तलाकची प्रथा बंद केली. काँग्रेस म्हणते की आम्ही पुन्हा वैयक्तिक कायदा पुनर्संचयित करू. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सार्वजनिक मालमत्ता घेऊन त्याचे वाटप करणार असल्याचे म्हटले आहे, असा आरोप योगींनी केला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला तुमची मालमत्ता लुटण्याची परवानगी द्यायची आहे का? असा सवालही केला आहे.