- गुंडगिरी वाईट, प्रत्येकालाच आत्मसंरक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाची व्यक्त केली गरज
नागपूर – एखाद्या देशाची प्रगती होऊ नये यासाठी अनेक शक्ती कार्यरत असतात. गेल्या काही वर्षा भारताची सर्वच क्षेत्रात प्रगती होतेय. त्यामुळे भारताला मागे ढकलण्यासाठी देशांतर्गत असंतोष आणि अराजकता पसरवण्याचे षडयंत्र आखले जातेय. यापासून अखंड सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.नागपुरात आज, शनिवारी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, भारतात सर्वत्र मूल्यांचा ऱ्हास आणि भेदभाव करणाऱ्या घटकांच्या समाज तोडण्याच्या खेळी दिसत आहेत. जात, भाषा, प्रदेश इत्यादी छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारताची सीमेवरील पंजाब, जम्मू-काश्मीर, लद्दाख, सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. हल्लीचा काळ हा थेट युद्धांचा नसून अशा प्रचारच्या विविध गोष्टींच्या माध्यमातून एखाद्या देशाची प्रगती थोपवली जाते. गेल्या काही वर्षात भारताने सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यामुळे भारताला बदनाम करणे, प्रगतीत अडथळे आणणे यासाठी जगातील काही शक्ती हे घडवून आणत आहेत. बांगलादेशातही हाच प्रयोग करण्यात आला. पाकिस्तानच्या अत्याचारातून मुक्तता करवून भारताने बांगलादेशच्या उभारणीला हातभार लागवला होता. परंतु, विदेशी शक्तींच्या षडयंत्रात अडकलेला बांगलादेश आज, पाकिस्तानला मित्र आणि भारताला आपला शत्रु मानतो. भारतातही असंतोष आणि अराजक पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून यापासून प्रत्येक भारतीयाने अखंड सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.
बांगलादेशसंदर्भात सरसंघचालक म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील हिंदू समाज एकत्रितपणे समोर आला म्हणून काही प्रमाणात त्यांचा बचाव झाला. मात्र जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. तेथे भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळावणी करण्याच्या गोष्टी होत आहेत. जगातील काही देश हे प्रयत्न करत आहेत. यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे. तसेच हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.
देशासमोरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत असताना समाजातील विकृती व कुसंस्कारांवरदेखील भाष्य केले.विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेटवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आवश्यक असून त्याबाबत कायदा करायला हवा, असे ते म्हणाले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिभत्सचेचे प्रदर्शन होते. त्याच्याबाबत कायदा हवेत, त्यानेच नियंत्रण येईल. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे, असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या समस्येवरदेखील उद्बोधन केले. पर्यावरणामुळे ऋतूचक्र पालटत आहे. पर्यावरणाबाबत अपुरा दृष्टीकोन आहे. आपण जगाचे अंधानुकरण केले व त्यामुळे पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या. आपल्या जैविक शेतीसारख्या पारंपारिक पद्धतींचा जीवनप्रणालीत समावेश करावा लागेल. पाणी वाचविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सिंगल युझ प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा, याकडे त्यांन लक्ष वेधले.
यावेळी सरसंघचालकांनी पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनेवर भाष्य सेले. कोलकात्याच्या आर.जी. कार हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणाऱ्या अशा घटनांपैकी एक आहे. अशा निंदनीय घटनेचा निषेध आणि त्वरित, संवेदनशील कारवाई करावी या मागणीसाठी संपूर्ण समाज वैद्यकीय क्षेत्रातील बांधवांच्या पाठीशी उभा राहिला. पण एवढा भीषम गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते, या शब्दांत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.
देशातील हिंसाचारांच्या घटनांवर भाष्य करताना डॉ. भागवत म्हणाले की, देशात काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गणेश उत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते. अशा घटनांवर आळा घालणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. परंतु, पोलिस येईपर्यंत स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गुंडगिरी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. परंतु, आत्मरक्षणाचा अधिकार सर्वांनाच असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. तसेच हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आणि संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.