पुणे : देशासाठी सहकार क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून या क्षेत्राच्या योगदानानेच देशाचा विकास साधला जाईल असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. पुण्यात आज, शनिवारी आयोजित जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अमित शहा म्हणाले की, पंतप्रधानांनी देशासाठी ठेवलेली दोन उद्दिष्टे निर्धारित केली असून ती देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहेत. पहिले उद्दिष्ट देशाला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे आणि दुसरे लक्ष्य 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणे हे आहे. ही दोन्ही उद्दिष्टे सहकार क्षेत्राच्या योगदानाने साध्य करता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून केंद्रीय सहकार मंत्रालय सुरू करण्यात आले आहे.
या मंत्रालयाच्या माध्यमातून देशात अनेक गोष्टींमध्ये क्रांती झाली आहे. सहकारातून समृद्धी या ब्रीद वाक्यावर मंत्रालय काम करते. जनता सहकारी बँकही त्याच धर्तीवर काम करते. देशात 1465 नागरी सहकारी बँका असून एकट्या महाराष्ट्रात 400 पेक्षा जास्त बँका आहेत. आम्ही एक विशेष संस्था सक्रिय करत आहोत. ही संस्था सर्व सहकारी बँकांना शक्य ती मदत करेल. त्यासाठी 300 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला आहे. अलीकडेच सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यात त्यांनी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेचे विधेयक लवकरच संसदेत मंजूर होईल, असे सांगितले होते. या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकारी क्षेत्राला कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच संधी मिळतील याची काळजी घेतली जाणार आहे.