अमरावती : रब्बीतील प्रमुख पिकांमध्ये कापसाचा समावेश होतो. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून कापसाचा दर समाधानकारक मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या झाल्या आहेत. शासकीय कापूस खरेदीसुद्धा दिवास्वप्न ठरत आहे. दरम्यान आता भाववाढ होतच नसल्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सध्या शहरातील खासगी बाजारात दिवसाला अडीच हजार क्विंटल कापसाची आवक सुरू असून, भाव ७ हजार २५० रुपयांपर्यंत मिळत आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी होती. जिल्ह्यात कापसाचे सरासरी उत्पादन जवळपास साडेदहा लाख क्विंटल होते. कापूस शेतकऱ्यांच्या अर्थचक्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पीक आहे. परंतु भावच नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत भाव होता. त्यानंतरही साडेनऊ ते दहा हजार रुपये भाव मिळाला. मात्र, मागील देन वर्षांपासून कापूस सात ते साडेसात हजारांच्या वर गेला नाही. कापसाची पेरणी ते वेचणीपर्यंत खर्च आणि मशागत खर्च लक्षात घेता कापूस विकणे या भावात परवडत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. भाव वाढ न झाल्यास येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातील कापसाच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.