पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कोठडीसाठी पुणे पोलिसांनी पुन्हा अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळत आरोपीला अतिरिक्त कोठडी देण्यास नकार दिला आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला यापूर्वी न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, तपासादरम्यान काही महत्त्वाच्या बाबींची चौकशी करावी लागणार असल्याने पोलिसांनी आरोपीची तीन दिवसांची अतिरिक्त कोठडी मागितली होती. पोलिसांनी २ एप्रिल रोजी न्यायालयात यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, आरोपीची पुरेशी कोठडी मिळाली असल्याचे नमूद करून न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे वाजेद खान (बीडकर) यांनी काम पहिले.