जम्मू – जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे आज सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्याला वीरमरण आले. यासंदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुडू भागात सीआरपीएफचे जवान नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला.
सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी दुपारी 3.30 वाजता केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे एक अधिकारी हुतात्मा झाले. तेथील संपूर्ण परिसरात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.