नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. त्यानंतर आज, बुधवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद आहेत. फेंगल वादळाने आज चक्रीवादळाचे रूप धारण केले आहे. या चक्रीवादळाचे अनेक राज्यांवर परिणाम होणार आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका तामिळनाडूला बसण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस तामिळनाडूमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकून तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-वायव्येकडे सरकेल असे आयएमडीने सांगितले. या वादळाला ’फेंगल’ हे नाव सौदी अरबने दिले असून, त्याचा अर्थ आक्रमक असा होतो.
जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिकद्वारे देखरेख केलेल्या पद्धतशीर प्रक्रियेचा भाग म्हणून चक्रीवादळ फेंगलला त्याचे नाव मिळाले. या संस्था हिंद महासागर क्षेत्रासाठी चक्रीवादळ नामकरण व्यवस्थापित करतात, ज्यात भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव आणि ओमान सारख्या देशांचा समावेश आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, विलुप्पुरमसह अन्य 15 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आयएमडीने बुधवारी तामिळनाडूच्या 3 आणि पुद्दुचेरीच्या एका जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र फेंगल चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. हिंदी महासागरात यंदाच्या वर्षभरातील हे तिसरे चक्रीवादळ आहे.