विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा – दादाजी भुसे

0

मुंबई : बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, बालभवनच्या संचालक नीता पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, जवाहर बालभवनला ७३ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे हे केंद्र अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कलागुणांना वाव मिळवून देणारे मुंबईतील सर्वात मोठे केंद्र बनावे. ज्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याची सोय नाही अशा शाळांसह महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या केंद्रात प्राधान्य द्यावे. येथे प्रेक्षागृहामधून माहिती देण्याची सोय, तारांगण आदी विद्यार्थ्यांना आवडतील अशा सोयी उपलब्ध करुन द्याव्यात, असेही भुसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आपली आवड जोपासता यावी त्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे याअनुषंगाने येथे गायन, नृत्य, खेळ, विविध छंद शिबीर, कार्यशाळा असे विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असल्याची माहिती संचालक श्रीमती पाटील यांनी यावेळी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech