नवी दिल्ली : तिबेटमधील बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना आता झेड श्रेणीची सीआरपीएफ सुक्षा दिली जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय खेण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर केला होता ज्यामध्ये दलाई लामांना धोका असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर गृहमंत्रालयाने त्यांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश जारी केला. तसेच ओडिशाच्या पुरी येथील खासदार संबित पात्रा यांनाही मणिपूरमध्ये झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. पात्रा हे मणिपूरमध्ये भाजपचे प्रभारी आहेत. वर्तमान दलाई लामा यांचे नाव ल्हामो थोंडुप असून त्यांना २ वर्षाच्या वयापासून पूर्वसुरींचा पुनर्जन्म म्हणून मान्यता मिळाली त्यानंतर तिबेटची राजधानी ल्हासा येथे १९४० मध्ये त्यांना १४ वे दलाई लामा म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानंतर १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. तिबेंटने त्याविरोधात संघर्ष केला परंतु, तो अपयशी ठरला १९५९ मध्ये चीनच्या विरोधातील उठाव अयशस्वी ठरल्यानंतर दलाई लामा यांनी भारताचा आश्रय घेतला. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे ते निर्वासित जीवन जगत आहेत. त्यांना १९८९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.