सिंधुदुर्ग : दशावतार याच लाल मातीतली कला असुन काही कानडी प्रेमी लोकांनी या लोककलेचा उगम कर्नाटकच्या यक्षगानातुन निर्माण झाल्याचा जावई शोध लावला आणि आमच्या दशावतारी लोककलेला काही लोकांनी बदनाम केले, अशा तीव्र शब्दातून आपल्या मनातील खदखद वेंगुर्ले येथे अखिल दशावतार नाट्य संमेलनात अध्यक्ष डॉ अशोक भाईडकर यांनी व्यक्त केली. वेंगुर्ले येथे सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या अखिल दशावतार नाट्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून या नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास वेंगुर्ले नगरपरिषदचे मुख्याधिकारी पारितोषिक कंकाळ, वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राठोड, परूळेकर, नाट्य कर्मी विजय चव्हाण, बुवा भालचंद्र केळुसकर, कलादान पुरस्कार विजेते जेष्ठ कलाकार यशवंत तेडोलकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गोवा येथील सप्तसूर चे संस्थापक विजय केरकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर, रांगोळीकार रमेश नरसुले आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय मुलांच्या विविध स्पर्धां आणि अनेक दिग्गज मान्यवरांच्या मनोगते दशावतार आज काल आणि उद्या यावर कलावंतानी केलेले भाष्य या संमेलनात महत्त्वाचा भाग ठरला. या मनोगतात पप्पू नांदोस्कर , बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण, संतोष रेडकर, महेश गंवडे, तुकाराम उर्फ अण्णा गावडे, यांनी आपली मनोगते मांडली. अखिल दशावतारी नाट्य संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोगी संस्थानी यांनी हे आयोजन केले होते. दशावतार लोककलेला अभिजात दर्जा मिळावा. कलावंताना राजाश्रय मिळावा या साठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आपण जाणिव पुर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन या माध्यमातून केले गेले.
दशावतार याच मातीतली समृद्ध लोककला असुन प्रा. वैभव खानोलकर यांनी विस्तृत लिखाण केले असुन त्याच्या बहुचर्चित पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्यात बरोबर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक सोहळा आणि जेष्ठ कलाकारानी साकारलेला संयुक्त दशावतार हा या संमेलनाचा केंद्रबिंदू ठरला.