हिंगोली : राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी वसमत तालुक्यातील गुंज येथील मयत ७ महिला शेतमजुरांच्या वारसांची सांत्वनापर भेट घेऊन त्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत केला. तसेच राज्य शासन मयतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे, माजी मंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णा राऊत याच्याशी यावेळी संवाद साधला. ‘तू चांगला अभ्यास कर, पुढील शिक्षणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
गुंज येथील महिला शेतमजुरांचा ४ एप्रिल रोजी आलेगाव येथील दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात शेतकामासाठी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसहीत विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामध्ये १) ताराबाई सटवाजी जाधव (३५), धुरपता सटवाजी जाधव (१८) सिमा (सिमरन) संतोष कांबळे (१८), सरस्वती लखन बुरड (२५), चऊतराबाई माधव पारधे (४५), मिना तुकाराम राऊत (२५) आणि ज्योती इरबाजी सरोदे (३०) यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज सातही मयतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाकडून घटनेतील मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना व जखमी झालेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी, यासाठी ७ एप्रिल रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले वसमत येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत वसमत शहर पाणीपुरवठा योजना, आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत कुरुंदा ता. वसमत येथील पूर नियंत्रण उपाययोजनेचे भूमीपूजन व बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वसमत येथे करण्यात आले.