वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

गोंदिया : काही जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते आता डोकी फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र शोले सिनेमातील असरानीप्रमाणे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अशी भाषा करु नये. आव्हान देण्यासाठी मनगटात ताकदं असावी लागते. वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. ते लोकसभेत हरले, विधानसभेत हरले आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही त्यांचा पराभव होणार, असे शिंदे म्हणाले. विदर्भातील देवरी, गोंदिया येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सहसराम करोटे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर मंत्री संजय राठोड, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांची महालाट आली आणि त्यात भलेभले वाहून गेले. काहीजण म्हणाले होते, तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. पण विधानसभेतील भाषणात २०० हून अधिक जागा निवडून आणू, अशी मी घोषणा केली होती. निवडणुकीत मी आणि देंवेंद्र फडणवीस यांनी मिळून महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. मागील अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर काम केले. विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना सुरु केल्या. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेल्या सर्व योजना सुरु केल्या, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री असताना ३५०० ते ४००० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला, असे ते म्हणाले. नरेंद्र भोंडेकर आणि त्यांची टीम मिळून आपल्याला विदर्भासाठी काम करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की सत्ता येते आणि जाते, पदं येतात आणि जातात, पुन्हा पदं मिळतात, मात्र लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राला समर्पित काम करेन, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. मी पदासाठी आणि खुर्चीसाठी कदापी कासावीस झालो नाही आणि होणार नाही. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला काय मिळाल हे पाहणारा मी आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. लोक शिवसेनेत येत आहे कारण हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेअर मार्केटमध्ये जसा गुंतवणूकदारांचा विश्वासावर चालते तसे शिवसेनेचे आहे. तुमचा विश्वास कदापी तुटू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.

मी सगळ्या धमक्यांना पुरुन उरणारा आणि पाठिशी उभा राहणारा आहे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मी बाळसाहेब आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. आनंद दिघे असताना डान्स बार, लेडिज बार बंद केले होते. त्यावेळीही अनेक धमक्या आल्या होत्या. गडचिरोलीचा पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या मात्र त्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठवण्याचे काम गडचिरोलीच्या पोलीसांनी केले. त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे शिंदे म्हणाले. मी धमक्यांना घाबरणारा नाही तर पुरुन उरणारा आहे, असा पुनरुच्चार शिंदे यांनी यावेळी केला. कोविड काळात पीपीई कीट घालून रुग्णांना आणि डॉक्टरांना दिलासा दिला. जोवर ही जनता पाठिशी हा तोवर जीवाला सोडा दाढीच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech