मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बाॅम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने बुलढाण्यातून अभय शिंगणे (वय २२), मंगेश वायाळ (वय ३५) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी जे. जे मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे आणि मंत्रालय या ठिकाणी इमेल करून धमकी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या नावाने ज्यावेळी धमकीचा मेल आला, तेव्हा ते दिल्लीत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते.
आरोपींपैकी अभय शिंगणे हा टेक्निशियन आहे तर मंगेश हा चालक आहे. दोघांनी मिळूनच धमक्या दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेतले आणि आता त्यांची चाैकशी केली जात आहे. या दोघांनी धमकी नेमकी का दिली आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
या दोघांनाही दारूचे व्यसन असून अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघेही नात्याने आते-माम भाऊ आहेत. या दोन्ही आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4) व 353 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासानुसार, या दोघांनी आपसातील वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात अलर्ट देण्यात आला होता.