काँग्रेसवासी बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी, एफआयआर दाखल

0

चंदीगड – भारताचा स्टार कुस्तीपटू आणि काँग्रेसवासी झालेल्या बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला विदेशी नंबरवरून ही धमकी मिळाली होती. त्याने तक्रारीत म्हटले की, ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा तुझी आणि तुझ्या कुटुंबाची खैर नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुला कुठेही तक्रार करायची असेल करं, हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे.’ यानंतर बजरंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यावर पोलिस प्रवक्ते रवींद्र सिंह यांनी सांगितले की, बजरंग पुनियाने सोनीपतमधील बहलगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याला बाहेरच्या नंबरवरून मेसेज आला आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई सुरू आहे. अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. हा तपासाचा विषय आहे. त्याचा तपास सुरू असून हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याशिवाय धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

बजरंग आणि विनेश फोगट यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने बजरंगला विधानसभेचे तिकीट दिले नाही, तर हरियाणा विधानसभेच्या जुलाना मतदारसंघातून विनेशला उमेदवारी दिली आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने बजरंगला काँग्रेस किसान मोर्चाचा कार्याध्यक्ष बनवले आहे. देशातील सर्वांत जुन्या पक्षात सामील होण्यापूर्वी त्याने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech