नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज, बुधवारी नोटीस बजावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने अतिशी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलैरोजी होणार आहे. कमलजीत सिंग दुग्गल आणि आयुष राणा यांनी अतिशी यांच्या आमदार म्हणून कालकाजी विधानसभा मतदारसंघातील निवडीला आव्हान दिले आहे. दोन्ही याचिकाकर्ते कालकाजी परिसरातील रहिवासी आहेत. अतिशी आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणुकीदरम्यान भ्रष्ट पद्धतींचा अवलंब केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच याचिकेत अतिशी यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांचा ३ हजार ५२१ मतांनी पराभव केला आहे. दरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी आतिशी मार्लेना, केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली पोलिस आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनाही या याचिकेवर नोटीस बजावली आहे.