नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री अतिशी यांच्याविरोधातील मानहानीचा खटला रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आम आदमी पक्षातर्फे सदर फौजदारी खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाने आज, सोमवारी ही याचिका फेटाळून लावली. भाजप नेते राजीव बब्बर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनूप कुमार म्हणाले की, लोकशाहीत नागरिकांना सत्य आणि अचूक माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.
मात्र, राजकीय पक्षांकडून चिखलफेक करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सध्याच्या प्रकरणात, ‘आप’चे भाजपवरील आरोप बदनामीकारक आहेत आणि ते भाजपला बदनाम करण्यासाठी, अवाजवी राजकीय फायदा मिळवण्यासाठी करण्यात आले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपने मानहानी खटल्यात म्हटले आहे की, आप नेत्यांनी डिसेंबर 2018 मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केले होते. भाजपच्या निर्देशांनुसार बनिया, पूर्वांचली आणि मुस्लिम समुदायातील सुमारे 30 लाख मतदारांची नावे निवडणूक आयोगाने मतदार यादीतून हटवली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याविरोधात हा फौजदारी मानहानी खटला दाखल करण्यात आला आहे.