कल्याण – कल्याण पूर्वेत शिव सुष्टी हे नेतिवली डोंगरावर रिकाम्या असलेल्या उंच जागेत निर्माण करण्याची मागणी आता जोर धरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वराज्य संस्थापक “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण शहरात सुंदर अशा नेतविली डोंगराचे किल्या मध्ये रूपांतर करून तेथे मराठा साम्राज्याचे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे जागतिक स्तरावरचे स्मारक निर्मान करणे संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मंजुर करून काम सुरू करावे, अशी मागणी तमाम कल्याणकर जनतेच्या वतिने करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापण केले. डोंगरावरील तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम राज्यकर्त्यांना लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श घालून दिला. अशा जागतिक स्तरावरील आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जगात पाहिले जाते अशा या आदर्श राजाची अनेक लहानमोठी स्मारके विविध ठिकाणी उभारली गेली आहेत.
आपल्या ठाणे जिल्हयातील कल्याण शहराला देखील ऐतिहासिक वारसा लाभला आहे स्वराज्याचा विस्तार करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी एकाच वेळी जिंकले. त्यावेळी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या ऐतिहासिक भूमीला लागले कल्याणच्या खाडी किनारी असलेला गढीवजा दुर्गाडी किल्ला आजदेखील कल्याणच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. ऐतिहासिक कल्याण शहराचा अविभाज्य भाग आहे. कल्याणच्या आजूबाजूच्या परिसराच्या टेहाळणीसाठी या नेतीवली डोंगराचा उपयोग शिव कालीन काळात केला जात असे.
नेतिवली टेकडीचा उंच असा भाग जो मोकळा आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव स्मारक / शिव सुष्टी उभारण्यात यावे अशी सर्व कल्याण करांची व शिव प्रेमींची इच्छा आहे, आणि नेतिवली टेकडीला नाविन्यपुर्ण स्वरूपाचे किल्ल्याचे रूप देऊन या टेकडीवर मराठा साम्राज्याचे, पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारका सह / शिव सुष्ट शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अध्ययन केंद्र उभारण्यात यावे.
सदर जागतिक स्मारक व अध्ययन केंद्रा अंतर्गत नेतिवली डोंगरावर २५ व्या शतकातील प्रतिरूप किल्ला स्वरूपात बांधण्यात यावा. त्या अंतर्गत नेतिवली टेकडी (डोंगराला) भोवती शिवकाळा प्रमाने तटबंदी बांधणे, आवश्यते प्रमाणे दगडी बुरूज बांधणे, दगडी महादरवाजा (प्रवेशद्वार) बांधणे, या आधुनिक किल्ल्यात आवश्यतेनुसार काही ऐतिहासिक वास्तू बांधण्यात याव्यात. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती उभारण्यात यावी. या बाबत शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या जागतिक स्तरावरील अभ्यासकांचे अभिप्राय घेण्यात यावेंत.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील जगभरात विविध भाषेत उपलब्ध असलेल्या ग्रंथांचे अदयावत दालन उभारण्यात यावे-तेथेच इतिहास अभ्यासकांसाठी अध्यायनाचे दालन उभारण्यात यावे, शिवकालातील ऐतिहासिक शस्त्रे, तोफा, बंदुका व युध्दकला यांचे संग्राहलय उभारण्यात यावे, कल्याणच्या खाडीतील स्वराज्याच्या आरमाराची प्रतिकृती येथे उभारण्यात यावी. जेणे करून जग भरातील शिव प्रेमी ते पहाण्यासाठी व छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याचा अभ्यास करण्यासाठी कल्याण येथे येतील.
आम्ही सर्व शिवप्रेमी शिवभक्त या पत्राद्ववारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, आपण लवकरात- लवकर आमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून नेतिवली डोंगरावर उंच अशा रिकाम्या असलेल्या जागेवर छत्रपती शिवरायांच्या पदस्पशनि पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण शहरात जागतिक दर्जाचे छत्रपती शिवरायांचे शिव स्मारक /शिव सुष्ट तसेच मराठा साम्राज्याचे पाऊलखुणांचे निशान फडकावे. सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर यावेळी अॅड धनंजय बाप्पासाहेब जोगदंड, अरविंद मोरे, सुभाष गायकडवाड, दिनेश तावडे, श्याम आवारे स्वाक्षरी असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.