देहू – आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या शुक्रवार २८ जून रोजी दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.ख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.देहूत पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहे.इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. पालखी मार्गावर जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे,संतोष महाराज मोरे यांनी सांगितले की, यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल.