ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या महायुतीला आशीर्वाद द्या – देवेंद्र फडणवीस

0

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून बळ देणाऱ्या महायुतीला आशीर्वाद द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. वरवंड (ता. दौंड) येथे भाजपा महायुतीचे दौंडचे उमेदवार आ. राहुल कुल यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. ऊस उत्पादक आणि सहकारी साखर कारखान्यांचे अनेक प्रश्न महायुती सरकारने मोदी सरकारच्या माध्यमातून सोडविले आहेत. यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री मुरेगेश निरानी, भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, आ. योगेश टिळेकर, दौलत शितोळे, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, बाळासाहेब गावडे आदी उपस्थित होते.

ऊसाची एफआरपी वाढविणे, एफआरपी पेक्षा अधिक दर दिला तर आयकर न लावणे या मोदी सरकारच्या निर्णयांची फडणवीस यांनी विस्ताराने माहिती दिली. या विराट सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने केले आहे. उसाचे राजकारण भाजपा वाल्यांना काय समजते असे म्हणणा-यांच्या नाकावर टिच्चून आज राज्यात साखर कारखानदारी पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयांमुळे उभी आहे. उस कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न मनमोहनसिंग सरकार असताना 6 वेळा खेटे मारून ही शरद पवार यांना सोडवणे जमले नाही ते काम अमित शाह सहकार मंत्री झाल्यावर एका झटक्यात झाले. उस कारखानदारांचा 10 हजार कोटींचा आयकर माफ केला.

आमचे राजकारण विकासाचे आहे. दुष्काळी भागांना ओलिताखाली आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. या भागात वर्षोनवर्षे मागणी असलेल्या खडकवासला टनेल चे 2200 कोटींचे टेंडर काढून काम सुरू केले आहे ज्यामुळे दौंडला 2 टीएमसी पाणी जास्तीचे मिळेल. बेबी कॅनॉल चे काम वेगाने करण्यासाठी अतिरिक्त 300 कोटी देखील सरकारने दिले आहेत. मुळशीचे पाणी या भागात आणण्याचे अशक्य वाटणारे काम अहवाल देऊन सुरू आहे. आम्हाला तिस-यांदा संधी दिलीत तर अहवालाला गती देऊन या भागाला पाणीदार करेन अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech